नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांची फसवणूक आणि महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्यावतीनं राज्यभरात आज धरणं आंदोलन करण्यात आलं.

नवी मुंबई शाखेच्यावतीनं तुर्भे इथल्या सर्कल तहसीलदार कार्यालय इथं काढण्यात आलेल्या मोर्चात मोठ्या प्रमाणात पदाधिकारी, नगरसेवक, सहभागी झाले होते.पालघर जिल्ह्यात नारळावर पांढरी माशी किडीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याबाबत कार्यवाही झालेली नसल्याच्या निषेधार्थ,मच्छीमारांची बिकट परिस्थिती लक्षात घेता ताबडतोब दुष्काळ जाहीर करावा तहसील कार्यालया समोर भाजपनं धरणं आंदोलन केलं.

धुळे जिल्ह्यात महाविकास आघाडी सरकारने शेतकरी, महिला, तरुण आणि सर्वसामान्य नागरीकांची घोर फसवणुक चालवली असल्याचा आरोप करत आज भाजपानं जिल्ह्याभरात धरणं आंदोलन करत जोरदार निदर्शेनं केली. धुळे जिल्ह्यात एकाच वेळी पाच ठिकाणी धरणं आंदोलन करण्यात आलं.

जालना जिल्ह्यातही भाजपच्यावतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्जमाफी करा, महिलांवरील वाढते अत्याचार रोखा, विजेचे भरनियमन बंद करा अशा मागण्यांच निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं.

अहमदनगर जिल्ह्यातही भाजपाचा विश्वासघात करून काँग्रेस- राष्ट्वादी बरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतक-यांचा विश्वासघात केला आहे. असं सांगत आज भाजपच्या वतीनं एल्गार आंदोलन आयोजित करण्यात आलं.

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सर्व तहसिल कार्यालयांसमोर आंदोलन करून विश्वासघातकी महाराष्ट्र विकास आघाडी सरकार बद्दल रोष व्यक्त केला.नाशिक आणि यवतमाळ जिल्ह्यातही आंदोलन करण्यात आलं.