नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या तीन वर्षात तिकीट रद्द करण्याचे शुल्क आणि प्रतिक्षा यादीतील रद्द न केलेल्या तिकिटांमधून रेल्वेने तब्बल ९ हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे.
सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीमने माहितीच्या अधिकारात ही माहिती उघड केली आहे.शयनयानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून या दोन्ही प्रकारात सर्वाधिक महसूल मिळाला. त्यानंतर तृतीय वातानुकूलित श्रेणीतील प्रवाशांचा क्रमांक लागतो.
१ जानेवारी २०१७ ते ३१ जानेवारी २०२० दरम्यान रेल्वेला हा महसूल मिळाला आहे. या कालावधीत तब्बल साडेनऊ कोटी प्रवाशांनी प्रतिक्षा यादीतील तिकीटे रद्द केली नाहीत.
त्यातून रेल्वेला ४३३५ कोटींचा महसूल मिळाला. तर तिकीट रद्द करण्याच्या शुल्कातून रेल्वेची ४६८४ कोटींची कमाई झाली. या काळात इंटरनेट द्वारे १४५ कोटी प्रवाशांनी तिकीटे काढली तर ७४ कोटी प्रवाशांनी तिकीट खिडकीवर जाऊन तिकीट काढले.