मुंबई : राज्याला गतिमान विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असा अर्थसंकल्प आज राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सादर केला. राज्याच्या शाश्वत कृषी विकासाला गती देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया अन्न व औषध प्रशासन, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली.

अर्थसंकल्पात शेती, सिंचन, उद्योग,रोजगार, स्वयंरोजगार, सामाजिक न्याय,वंचित घटकांच्या आर्थिक, सामाजिक विकास याकरिता भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. तसेच तरुण,महिला, ओबीसी, दलित, आदिवासी,अल्पसंख्याक, दिव्यांग अशा सर्व समाजघटकांचे प्रतिनिधित्व प्रतिबिंबित करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

महसूल मंडळ स्तरावर हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठी हवामान केंद्राची स्थापना, कृषी संशोधनाकरिता चार कृषी विद्यापीठांसाठी 600 कोटी रुपयांची तरतूद, कृषी सिंचन योजनांसाठी 2 हजार 720 कोटी रुपयांची तरतूद, जलसिंचन योजनेसाठी1 हजार 530 कोटी रुपयांची तरतूद,मृदा व जलसंधारण विभागाकरीता 3हजार 182 कोटी रुपये,  बळीराजा जल जलसंजीवनी योजनेसाठी 1 हजार 531कोटी रुपये तरतूद अशा विविध योजनांच्या माध्यमातून सक्षम कृषी विकास साधण्याचा स्पष्ट संकेत अर्थसंकल्पातून प्रतिबिंब होत आहे.

सामाजिक समतोल साधण्याबरोबरच राज्यातील आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी  तीर्थक्षेत्रांच्या नूतनीकरणासाठी 100 कोटी रुपयांची तरतूदही महत्त्वपूर्ण आहे, असेही मंत्री श्री. रावल यांनी सांगितले.