आंतरशालेय विज्ञान स्पर्धेत अश्विनी इंटरनॅशनल स्कूल आणि एसबी पाटील पब्लिक स्कूलचा प्रथम क्रमांक

पिंपरी : इस्त्रो या अवकाश संशोधन केंद्रात गुगल पेक्षाही जास्त वेगाने काम करु शकणारे जीपीआरएस तंत्रज्ञान लवकरच विकसित होईल. अवकाश संशोधनात भारतीय शास्त्रज्ञांनी लक्षवेधी गगनभरारी मारली आहे. आतापर्यंत भारतासह अनेक देशांनी अवकाशात सोडलेले निष्क्रिय उपग्रह परत पृथ्वीवर आणण्यासाठी जागतिक स्थरावर मोठे प्रयत्न सुरु आहेत. आजचे भारतीय विद्यार्थी आगामी काही वर्षांत यावर संशोधन करुन नक्कीच यश मिळवतील, असा आशावाद इस्त्रोतील ज्येष्ठ माजी वैज्ञानिक डॉ. ए. के. सिन्हा यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय विज्ञानदिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील एसबी पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘अविष्कार’ ही आंतरशालेय विज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्‌घाटन डॉ. सिन्हा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ गणितज्ञ डॉ. दिलीप देशमुख, मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी, पर्यवेक्षिका पद्मावती बंडा, शुभांगी कुलकर्णी आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी अवकाश, कृषी आणि अंतराळ या तीन विषयांत आपल्या प्रतिकृती आणि त्यांच्या संकल्पना सादर केल्या. कृषी विभागांमध्ये आधुनिक शेती, मातीच्या वापराशिवाय शहरांमध्ये कमीत कमी पाण्यावरच्या पालेभाज्या आणि फळे, भाज्यांचे उत्पादन, स्मार्ट ॲप व्दारे मातीतील ओलाव्याचे प्रमाण परीक्षण करून शेतीला यंत्राव्दारे पाणीपुरवठा, गणितातील अपूर्णांक, गुणाकार, भागाकार हसत-खेळत शिकत गणिताच्या विविध युक्त्या विद्यार्थ्यांनी सादर केल्या.

स्पर्धेचे विजेते पाचवी ते सहावी प्रथम क्रमांक अश्विनी इंटरनॅशनल स्कूल, व्दितीय क्रमांक विभागून एसबी पाटील पब्लिक स्कूल आणि सिटी प्राइड स्कूल, पाचवी ते सहावी प्रथम क्रमांक – एसबी पाटील पब्लिक स्कूल, व्दितीय क्रमांक – सेंट जोसेफ स्कूल, सातवी ते नववी – प्रथम क्रमांक – एसबी पाटील पब्लिक स्कूल, व्दितीय क्रमांक अश्विनी इंटरनॅशनल स्कूल, नावीन्यपूर्व प्रयोग – आझम कॅम्पस आणि विशेष पर्यावरण पूरक पुरस्कार – सीएमएस स्कूल या संघांना पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील व भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संयोजनात वर्षा देशमुख, दर्शना कामत यांनी सहभाग घेतला होता. स्वागत पद्मावती बंडा, सूत्रसंचालन स्वलेहा मुजावर आणि आभार निवेदिता विश्वास यांनी केले.