मुंबई : प्रभु रामाचे चरित्र आसेतु हिमालय भारताला जोडणारे आहे. महात्मा गांधींना देशात रामराज्य आणायचे होते. त्यांना अभिप्रेत भारत निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने देश स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
गोरेगाव मुंबई येथील शहीद स्मृती क्रिडांगण येथे गोरेगाव महोत्सवा अंतर्गत शनिवारी गीत रामायणाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, गोरेगाव महोत्सवाचे निमंत्रक जयप्रकाश ठाकुर, माजी राज्यमंत्री विद्या ठाकुर, डाॅ.अशोक सिंह, विष्णू रानडे आदी उपस्थित होते.
गीत रामायणामुळे रामायण अजरामर झाले आहे, असे सांगून आपण सुधीर फडके यांच्या मुखातून रामायण ऐकल्याचे कोश्यारी यांनी सांगितले. यावेळी राज्यपालांनी श्रीधर फडके यांनी सादर केलेल्या गीत रामायणाचे श्रवण केले.