नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात महिला सबलीकरणासाठी एक राष्ट्रीय चळवळ उभारली पाहिजे असं मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं आहे. समाजमाध्यमावर जारी केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी ही भावना व्यक्त केली आहे.

देशातल्या कोणत्याही मुलीला शिक्षण अर्ध्यावर सोडावं लागू नये अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या अभियानाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असूनही समाजाची मानसिकता बदलण्यासाठी फार काम करावं लागणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

भेद मिटवा आणि महिला सशक्तीकरणाला प्राधान्य द्या अशा शिर्षकाखालील या पोस्टमध्ये देशाच्या लोकसंख्येत पन्नास टक्के असलेल्या महिलांच्या सहभागाशिवाय प्रगती साधता येणार नाही, असंही ते म्हणाले.