मुंबई : राज्य शासनाने सन2019-20 या वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात मनुष्यबळ विकास आणि शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीला प्रोत्साहन दिले असल्याची प्रतिक्रिया उच्च शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली आहे.
श्री. तावडे म्हणाले, महाराष्ट्राची वाचन चळवळ अबाधित ठेवताना महाराष्ट्राच्या ग्रंथालय परंपरेचा समृध्द वारसा जोपासणाऱ्या एशियाटिक ग्रंथालयाचे डिजिटायजेशन, राज्यातील 8शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये ई-ग्रंथालयात रुपांतरित करण्यात येणार आहेत. तर उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये शिक्षकांना त्यांच्या संबंधित क्षेत्राचे अद्ययावत ज्ञान शैक्षणिक पध्दती व तंत्रज्ञान यांनी समृध्द करुन शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी येत्या 5वर्षाच्या कालावधीत 50 हजार शिक्षकांना प्रशिक्षित व प्रोत्साहित करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. विद्यार्थी चळवळीचा अभ्यास करण्यासाठी कै.बाळ आपटे, सेंटर फॉर स्टडिज इन स्टूडंट ॲन्ड युथ मुव्हमेंट नावाचे केंद्र मुंबई विद्यापीठांतर्गत स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. दृष्य कलेच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या नामवंत व ज्येष्ठ कलाकारांचा यथोचित सन्मान करण्याकरिता “कै.वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार” देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याशिवाय सर जे.जे. कला, वास्तुशास्त्र आणि उपयोजित कला महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधांकरिता अनुदानही देण्यात येणार आहे. बालरंगभूमीची समृद्ध परंपरा अधिक समृद्ध करण्याकरिता बाल कलावंतांना प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने बालनाट्य स्पर्धांच्या केद्रांची संख्या वाढविण्यात आलेली आहे. एकंदरीतच मनुष्यबळ विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प आहे.