नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुसळधार पावसामुळे मुंबईत कालपासून घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये मरण पावलेल्यांची एकूण संख्या ३१ वर पोचली आहे. आज वांद्रे रेक्लेमेशन येथे एका घरात पाणी शिरल्यानंतर, वीजेचा झटका बसून घरातल्या एका महिलेचा मृत्यू झाला. या महिलेला भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते, तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिला मृत झाली असल्याचे घोषित केले अशी माहिती ल्याची माहिती वांद्रे पोलीसांनी दिली आहे.

मुंबईत आता पावसाने उसंत घेतली असली, तरी अधून मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. काल रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले, वाहतूकही खोळंबली. विक्रोळी आणि कांजुर दरम्यान मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. त्यामुळे काही काळ या मार्गावरची वाहतूक स्थिगित करावी लागली होती. आता सर्व मार्गिकांवरून वाहतूक सुरु असली, तरी विक्रोळी आणि कांजुर दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबईत रुळांवर पाणी साचल्यामुळे मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेससह कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या नऊ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय पाच गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याचे कोकण रेल्वेने कळवले आहे.ठाणे जिल्ह्यातही जोरदार पाऊस होत आहे. ठाणे शहरात तीन ठिकाणी संरक्षक भिंती कोसळल्या. त्यात काही वाहनांचे नुकसान झाले. ठाण्यात काही भागांमध्ये पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या. मुंब्य्रात शाळा आणि रुग्णालयातही पाणी साचले.

उल्हासनगरमधे नाल्याचा प्रवाह वाढल्याने ४ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. अंबरनाथच्या ऐतिहासिक शिवमंदिराजवळ वालधुनी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने स्थानिकांना धोक्याचा इशारा दिला आहे. भातसा नदीचा प्रवाह फुगला असून पिसे गावातल्या संयंत्रात पाणी शिरल्याने ठाण्यात पुढचे दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल असे महानगरपालिकेने कळवले आहे.नवी मुंबई परिसरात काल दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने शहरातल्या सखल भागात पाणी साचायला सुरूवात झाली. मात्र महापालिकेने पाणी उपसा करणारे पंप सुरू केल्याने पाण्याचा निचरा सुरू झाला. दरम्यान, संध्याकाळी सीबीडी आर्टिस्ट व्हिलेज इथल्या धबधब्यावर ८ ते १० जण, तसेच आडिवली भुतिवली इथल्या धबधब्यातही १० ते १५ जण अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर दोन्ही ठिकाणी अग्निशमन दल आणि पोलीस त्यांची सुटका करण्यासाठी दाखल झाले. ही माहिती महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली. पालघर जिल्ह्यात गेले दोन दिवस मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सफाळे गावात घरात पाणी शिरल्याने अडकलेल्या सुमारे ५० जणांना पोलीस आणि ग्रामस्थांनी सुखरूप बाहेर काढले.