नवी दिल्ली : अनेक वाहिन्यांवर सुरु असलेल्या रीएलीटी शो म्हणजे विविध कलागुणांना वाव देण्याऱ्या कार्यक्रमात लहान मुले, चित्रपटात किंवा इतर मनोरंजाच्या कार्यक्रमात मोठ्या वयाच्या कलाकारांनी केलेले नृत्य सादर करत असल्याचे माहिती-प्रसारण मंत्रालयाच्या लक्षात आले आहे.ह्या नृत्यात असलेले अनेक हावभाव आणि अंगविक्षेप सूचक आणि त्यांच्या वयाला न शोभणारे असतात. अशा अश्लील अंगविक्षेपांमुळे लहान तसेच अनुकरणशील वयातल्या मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होऊ शकतात.
हे लक्षात घेऊन, माहिती व प्रसारण मंत्रालयाने सर्व खाजगी उपग्रह वाहिन्यांना दिशानिर्देश जारी केले असून, 1995 च्या केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियामक कायद्याअंतर्गत ह्या नियमांचे पालन करण्याची सूचना केली आहे. ह्या नियमानुसार, कोणत्याही वाहिनीने, लहान मुलांसाठीच्या कार्यक्रमात अशा प्रकारची नृत्ये केली अथवा दाखवली जाऊ नये. तसेच मुलांसाठीच्या कार्यक्रमात वाईट भाषा आणि हिंसक दृश्यांचा समावेश नसावा.
मुलांनी अशा अश्लील, सूचक आणि अयोग्य हावभावांचे नृत्य करणारे कार्यक्रम वाहिन्यांनी दाखवू नये, अशा सूचना या दिशानिर्देशात करण्यात आल्या आहेत. लहान मुलांशी सबंधित कार्यक्रमांचे चित्रीकरण आणि प्रसारण करतांना, संवेदनशीलता व जबाबदारीचे भान ठेवण्याचा सल्ला मंत्रालयाने दिला आहे.