केपीआयटी स्पार्कलचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न
टीम डीटॉक्स आर्मी स्कूल पुणे यांना गोल्ड ॲवार्ड

पिंपरी : भारतामध्ये मोठ्या प्रमाणात बौध्दिक कुशलता आहे. त्याला अधिक चालना मिळण्यासाठी व त्या बौध्दिकतेचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांचे मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी केला पाहिजे. या युवा अभियंत्यांच्या नाविण्यपुर्ण संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी व्यापक व्यासपीठ आणि बाजारपेठ उपलब्ध करुन दिली पाहिजे. यासाठी राष्ट्रीय स्थरावर ‘इनोव्हेशन क्लस्टर’ स्थापन केल्यास त्यातून रोजगारनिर्मितीस चालना मिळेल तसेच राष्ट्रीय जीडीपी वाढण्यास मदत होईल. असे प्रतिपादन भारतीय अणूऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) आणि केपीआयटी यांच्या सहयोगाने आकुर्डी येथे आयोजित केलेल्या ‘केपीआयटी स्पार्कल स्पर्धेचा’ बक्षिस वितरण समारंभ रविवारी (दि. 1 मार्च) डॉ. काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी केपीआयटीचे रवि पंडीत, अनुप साबळे, अटल फाऊंडेशनचे उन्नत पंडीत, डॉ. अनिता गुप्ता, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. निळकंठ चोपडे आदी उपस्थित होते.

यावेळी स्पर्धेक विजेत्यांना मार्गदर्शन करताना डॉ. काकोडकर म्हणाले की, भारतामध्ये वैयक्तिक वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वायु प्रदूषण व पर्यावरणाची समस्या उग्ररुप धारण करीत आहे. यावर उपाय म्हणून अपारंपरिक ऊर्जास्त्रोत्रांचा वापर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत व छोट्या मोठ्या वाहनांसाठी वाढला पाहिजे. तर प्रदूषणाच्या परिणामांपासून पुढच्या पिढीला थोडाफार दिलासा मिळेल. केपीआयटी स्पार्कल या स्पर्धेत प्रकल्प सादर करताना विद्यार्थ्यांनी भरपूर तयारी केल्याचे दिसले. सर्व सामान्यांना भेडसावणारे प्रश्न समजून घेतले तर त्यावर उपाय सापडेल असे डॉ. काकोडकर म्हणाले.

उन्नत पंडीत म्हणाले की, विद्यार्थ्यांचा प्रत्येक प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टीकोन दिवसेंदिवस विकसित होत आहे. ते प्रश्न सोडविण्यासाठी कमी खर्चातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. केंद्र सरकारच्या अटल स्टार्टअप सेंटरच्या माध्यमातून इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी आर्थिक मदत करण्यात येते. अनिता गुप्ता, अनुप साबळे यांनीही मनोगत व्यक्त केले.

ही राष्ट्रीय स्पर्धा पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. निळकंठ चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते.

गेल्या तीन वर्षांपासून पीसीसीओई व केपीआयटी यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेत देशभरातून तीन हजारांहून जास्त अभियांत्रिकी महाविद्यालयांनी प्रवेश घेतला होता. यातून शंभर टिमने महाअंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. टीम डीटॉक्स आर्मी स्कूल पुणे यांना पाच लाखांचे गोल्ड अँँवार्ड, झिंक एअर व टीम व्हर्टेक्स यांना प्रत्येकी अडीच लाखांचे सिव्हर ॲवार्ड आणि मोस्ट पॉप्युलर ॲवार्ड बायो टिमला तसेच उत्तेजनार्थ बक्षिस टीम व्हिल, टीम युव्ही आणि ऊर्जा यांना देण्यात आले. एकूण एकवीस लाख रुपयांचे बक्षिसे देण्यात आली.

स्वागत रवि पंडीत, सुत्रसंचालन डॉ. विनिला बेडेकर, आभार प्राचार्य डॉ. निळकंठ चोपडे यांनी मानले.