बारामती  :  आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने दिनांक 21 जून 2019 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा तालुकास्तरीय कार्यक्रम बारामती येथील म.ए.सोसायटीचे हायस्कूलच्या व रेल्वे स्टेशनच्या विरुध्द बाजुला असणा-या मैदानावर सकाळी 7 ते 8 या वेळेत होणार असल्याचे तहसिलदार विजय पाटील यांनी सांगितले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत.
या योग‍ दिनाच्या पुर्वतयारीची बैठक तहसिलदार विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय, बारामती येथे झाली. यावेळी तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, राजेंद्र खोमणे, बारामती क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संजय होळकर, प्रा.लक्ष्मण मेटकरी, प्रा.अशोक देवकर, राजेंद्र पोमाणे, अनिल गावडे, आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, कबड्डी कोच दादासो आव्हाड, कराटे कोच रविंद्र करळे, व्हॅालीबॉल कोच शिवाजी जाधव, गट शिक्षण अधिकारी कार्यालय व गट विकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी , नेहरु युवा केंद्र बारामतीचे श्री.तुषार आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने म.ए.सो.हायस्कूलच्या मैदानाची पाहणी तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, मुख्याध्यापक व्ही.के.सोनवणे व बारामतीच्या क्रीडा शिक्षक संघटनेच्या सर्व पदाधिका-यांच्या उपस्थितीत केली. या मैदानामध्ये साधारण 5000 नागरिकांची बैठक व्यवस्था करण्यात आली असल्याचे श्री.लकडे यांनी सांगितले.

तहसिलदार विजय पाटील यांनी योगादिनाच्या आयोजनाबाबतच्या तयारीचा आढावा घेतला. तसेच सर्व बालक, युवक,ज्येष्ठांनी या आरोग्यासाठी पोषक असणा-या व सदृढ बनवणा-या योगासाठी या योग दिनानिमित्तच्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये तालुक्यातील सर्वांनी सहभाग करण्याचे आवाहन केले.