मुंबई : राज्य शासन शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढविणार असून लवकरच राज्यात एक लाख थाळ्या दररोज देण्याचा कार्यक्रम आखला असून तालुका स्तरापर्यंत याची व्याप्ती वाढविण्याचा विचार असल्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभेत अन्न व नागरी पुरवठा, ग्रामविकास, सहकार, वस्त्रोद्योग या विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना श्री.भुजबळ बोलत होते.

श्री.भुजबळ म्हणाले, शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढविण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी 150 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शिवभोजन ही प्रायोगिक तत्वावरील योजना असून टप्प्याटप्प्याने तिची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर यासारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये भोजन केंद्राची संख्या वाढविण्यात येणार असून थाळी संख्यादेखील वाढवली आहे.

उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस कनेक्शन असलेल्या लाभार्थ्यांकडे सिलेंडर आहे मात्र ते सिलेंडर पुन्हा भरण्याची त्यांच्याकडे आर्थिक क्षमता नसल्याने सिलेंडर विनावापर पडून आहे. अशा लोकांना शिधापत्रिकेवर केरोसिन देण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन मंत्रिमंडळापुढे सादर केला जाईल असेही श्री.भुजबळ यांनी सांगितले.