नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्याचं नवीन वीज धोरण येत्या तीन महिन्यात निश्चित केलं जाईल, अशी माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज विधानपरिषदेत दिली. विजेच्या दरात सवलती देण्यासंदर्भात, तसंच वीज गळती रोखण्यासाठी आणि तूट कमी करण्याबाबत ऊर्जा विभाग अभ्यास करत आहे. त्याचा अहवाल तीन महिन्यात मिळेल, असं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या जनतेला १०० युनिट पर्यंत मोफत वीज देण्याचा सरकारचा विचार असून, अहवाल आल्यानंतरच या संदर्भात निर्णय घेतला जाईल, असं ते म्हणाले.
सारथी संस्थेत झालेल्या गैरव्यवहाराचा चौकशी अहवाल मिळाल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल ग्वाही बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज विधानपरिषदेत दिली. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती या प्रकरणाची चौकशी करत आहे. येत्या १० दिवसात या समितीवर प्रशासकीय दर्जाचा अधिकारी तसंच पूर्ण वेळ निबंधक, लेखाधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक नेमण्याचं आश्वासनही वडेट्टीवार यांनी दिलं. मराठा आणि कुणबी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सारथी ही संस्था स्थापन केली होती. या संस्थेची स्वायत्तता अबाधित ठेवून, संस्थेकरता आगामी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.
भाजपाचे भाई गिरकर यांनी मुंबईत आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाचा मुद्दा लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण विषयावर निर्णय दिल्याशिवाय नियुक्तीबाबत निर्णय घेता येणार नाही असं वडेट्टीवार यांनी या मुद्यावर उत्तर देताना स्पष्ट केलं. अंमली पदार्थांच्या वाढत्या व्यसनाधीनतेपासून नागरिकांना परावृत्त करण्यासाठी अशासकीय संस्था एनजीओच्या माध्यमातून जनजागृती करणार असल्याचं, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत सांगितलं. ते अंमली पदार्थांच्या वापरावर झालेल्या चर्चेदरम्यान बोलत होते.
मुंबईतल्या जे. जे. रुग्णालयाला दीडशे वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त, या रुग्णालयात स्वतंत्र कर्करोग विभाग सुरू करण्यासाठी लवकरच धोरण निश्चित केलं जाईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी विधानपरिषदेत दिली. आमदारांच्या आरोग्य सेवेसाठीही राज्य सरकार आखत असून, लवकरच त्याचा आराखडा तयार केला जाईल असंही त्यांनी सांगितलं. वैद्यकीय शिक्षणाचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यासाठी लवकरच शासन आदेश काढला जाईल असंही त्यांनी सांगितलं.
लक्षवेधी सूचनेद्वारे आमदार जोगेंद्र कवाडे यांनी जे.जे. रुग्णालयात गेल्या सहा महिन्यांपासून हृदय शस्त्रक्रिया बंद असल्याचा आरोप केला होता. मात्र देशमुख यांनी हा आरोप फेटाळत रुग्णालयातल्या हृदय शस्त्रक्रिया बंद पडलेल्या नसल्याचं स्पष्ट केलं.