मुंबई : अंमली पदार्थांचा वाढता विळखा रोखण्यासाठी कायदेशीर कठोर उपाययोनांबरोबरच जनजागृतीही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यासाठी शासन स्तरावर कार्यवाही करण्यात येईल. स्वयंसेवी संस्थाचीही जनजागृतीसाठी मदत घेण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य आर्कि. अनंत गाडगीळ यांनी अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यापासून तरुणाईला रोखण्याच्या उपाययोजनांविषयीची लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना श्री. देशमुख बोलत होते. अंमली पदार्थांचा वाढता विळखा रोखण्यासाठी कार्यशाळा, जनजागृती पंधरवडा, जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन शासन स्तरावर करण्यात येणार आहे. यासोबतच आपल्या पाल्यांवर पालकांनीही लक्ष देण्याची गरज आहे. समाजाच्या सर्व घटकांचा सहभाग हा अंमली पदार्थांचा विळखा रोखण्यासाठी महत्त्वूर्ण ठरणार असल्याचे श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.
लक्षवेधीवरील चर्चेत सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे, अंबादास दानवे, विजय उर्फ भाई गिरकर, वजाहत मिर्झा, रामदास आंबटकर, डॉ. परिणय फुके यांनी भाग घेतला