नागपूर : मराठवाडा व विदर्भातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून त्यांच्या विकासासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने दुग्धप्रक्रियेवर भर देण्याची आवश्यकता असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.
मराठवाडा व विदर्भ दुग्ध विकासासंदर्भात विदर्भ को ऑ. मार्केटींग फेडरेशनच्या कार्यालयात राष्ट्रीय दूध विकास मंडळ (एनडीडीबी) व दुग्ध व पशुसंवर्धन विभागाच्या अधिका-यांची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, एनडीडीबीचे अधिकारी, उपायुक्त डॉ. जाजू, महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे डॉ. कुमरे, डॉ. सूर्यवंशी, डॉ. धोतरे आदि अधिकारी उपस्थित होते.
दूध उत्पादक संघ तसेच कंपन्यांनी पारंपरिक पद्धतीने शेतक-यांकडून दूध विकत घेत पँकींग करून विकण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करावी. त्यामुळे शेतक-यांकडे दुधाची मागणी वाढेल. परिणामी, उत्पादन वाढवून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.
सद्यस्थितीत नागपूरला 5 लाख लिटरची गरज असून, वाढत्या मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी नागपूर जिल्ह्यात शेतक-यांना प्रशिक्षित करण्याचे निर्देश श्री. केदार यांनी दिलेत. हे प्रशिक्षण जिल्हा परिषदेच्या सहकार्याने सुरुवातीला पारशिवनी तालुक्यातील शेतक-यांना दिले जाईल. त्यानंतर एप्रिलअखेर जिल्ह्यातील सर्व दूध उत्पादक शेतक-यांना प्रशिक्षित करण्याबाबतही त्यांनी यंत्रढेला सांगितले.
कृषिपूरक व्यवसायातून शेतक-यांचे कुटुंब व्यवस्थित चालविता येईल, असा त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे असून, दूध व दुग्धजन्य पदार्थांचे मार्केटिंग करण्यावर भर देण्याच्या सूचना श्री. केदार यांनी दिल्या. दूध उत्पादन वाढीसाठी आवश्यक संकरीत चारा, त्याचे संगोपन, योग्य वाढ झालेला चारा, कापणीचा कालावधी, पशुखाद्याला मिळत असलेले अनुदान यावरही चर्चा करण्यात आली.