मुंबई : पुण्याची भिडे वाडा शाळा हे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी शासन सकारात्मक असून त्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही पूर्ण करणार असल्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.
श्री. शिंदे म्हणाले, भिडे वाडा येथे महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली असल्याने त्या वास्तूचे महत्त्व आहे. या ठिकाणी असलेल्या नऊ गाळ्यांच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे. मात्र यापैकी काही गाळेधारक उच्च न्यायालयात गेल्याने देखभाल दुरुस्तीवरही स्थगिती आलेली आहे. या गाळेधारकांचे मतपरिवर्तन व्हावे यासाठी त्यांच्यासोबत चर्चा करून न्यायालयातील स्थगिती हटवावी लागेल त्याच प्रमाणे या गाळेधारकांचे पुनर्वसन करून या वास्तूला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण करून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा असे निर्देश पुणे महानगरपालिकेला देण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य सर्वश्री, नागोराव गाणार, जोगेंद्र कवाडे, श्रीमती विद्या चव्हाण, स्मिता वाघ आदींनी प्रश्न उपस्थित केला होता.