पिंपरी : स्वातंत्र्यानंतरच्या सत्तर वर्षांच्या कालखंडात भारताने विज्ञान, तंत्रज्ञान, अणू क्षेत्रात लक्षणिय प्रगती केली आहे. परंतू अजूनही भारत देश अर्थ क्षेत्रात ‘विकसनशील’ आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने ‘सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आणि आजीवन अध्ययन दृष्टीकोण’ या विषयावर आयोजित केलेल्या चर्चासत्राच्या प्रथम सत्रात उद्घाटन प्रसंगी डॉ. उमराणी बोलत होते. यावेळी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, संचालक व विभाग प्रमुख प्रा. डॉ. धनंजय लोखंडे, समन्वयक डॉ. सतिश शिरसाठ, बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रताप गुरव, प्रा. ॲड. राजन दिक्षीत. ॲड. मंगेश ससाणे, डॉ. प्रल्हाद वडगावकर, डॉ. विलास आढाव, मृणाल ढोले पाटील, आनंदा कुदळे आदी उपस्थित होते.
डॉ. उमराणी म्हणाले की, जगाची अर्थव्यवस्था 88 ट्रिलीयन डॉलर्स आहे. यामध्ये भारताचा फक्त अडीच टक्के हिस्सा आहे. देशाचा स्वाभिमान, अस्मिता जपणे आवश्यक आहे. एकूण लोकसंख्येतील फार मोठा जनसमुदाय आपल्या अधिकारांपासून हक्क, सुविधा, ज्ञान पासून वंचित आहे. शिक्षण आता एक उद्योग झाला आहे. परंतू सर्व नागरिकांना सामाजिक, सांस्कृतिक आचरण समानतेने मिळायला हवे. जोपर्यंत आपण मोठ्या समुदायामध्ये वैज्ञानिक मनोभाव रुजवत नाही, तोपर्यंत विकास होणे शक्य नाही. विज्ञान आणि सामाजिक विज्ञान जेंव्हा एकत्र येऊन काम करतील तेंव्हाच भारत महासत्ता होऊ शकतो, अशी आशावाद डॉ. उमराणी यांनी व्यक्त केला.
‘सामाजिक आणि शैक्षणिदृष्ट्या मागासवर्गीय व सामाजिक न्याय’ या विषयावर प्रा. अँँड. राजन दिक्षीत यांनी सांगितले की, अन्न, वस्त्र, निवारा बरोबरच आर्थिक, शैक्षणिक न्याय मिळणे म्हणजेच सामाजिक न्याय होय. 1882 साली हंटर कमिशन समोर महात्मा जोतीराव फुलेंनी सर्वांना मोफत समान शिक्षण मिळावे, अशी मागणी केली होती. ही शैक्षणिक समानतेची मागणी अद्यापही पुर्ण झाली नाही.
‘शिक्षण क्षेत्राकडे’ सामाजिक बांधिलकी ऐवजी पैसा मिळवून देणारे क्षेत्र म्हणून पाहिले जाते. सरकार शिक्षण क्षेत्राला अनूदान वाढवून देण्याऐवजी शैक्षणिक कर्जाला प्रोत्साहन देत आहे, अशी खंत ॲड. दिक्षीत यांनी व्यक्त केली. प्रताप गुरव यांच्या हस्ते डॉ. उमराणी यांचे संविधान प्रत देऊन स्वागत करण्यात आले.