पुणे : आगामी विधानसभा निवडणुका मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस अधिकारी यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे काम करावे व निवडणूक प्रक्रिया यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
विधानसभा निवडणूक पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा जुन्नर-आंबेगावचे उपविभागीय अधिकारी जितेंद्र डुडी, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त मितेश घटटे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था, आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे निवडणूक प्रक्रियेबाबत काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीसाठी निश्चित केलेल्या मतदान केंद्रावर आवश्यक त्या उपाययोजना करण्याची दक्षता घ्यावी, अशी सूचना करुन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदान केंद्राची पाहणी करावी व सोईसुविधांचा आढावा घ्यावा, तसेच दिव्यांग मतदारांच्या सोयीसाठी तळमजल्यावर मतदान केंद्र ठेवावीत, तसेच आवश्यकतेप्रमाणे तात्पुरते मतदान केंद्र स्थापन करावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या. कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी कराव्या लागणा-या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणूक यंत्रणेतील अधिका-यांनी कार्यवाही करावी असे सांगून मतदारांच्या तक्रार निवारणासाठी विधानसभा मतदारसंघ निहाय एका नोडल अधिका-याची नियुक्ती करावी, असेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.
यावेळी पॉवरपाईंट प्रेझेंटेशनद्वारे पुणे जिल्हयाच्या अनुषंगाने निवडणूक विभागाची पूर्वतयारी, कायदा व सुव्यवस्था आणि आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने उपाययोजनाबाबत उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी सविस्तर माहिती दिली.
जिल्हयातील एकूण मतदार, मतदान केंद्रे, एक खिडकी योजना, समाधान ॲप, दिव्यांग मतदारांची संख्या व त्यानुसार करावयाचे नियोजन, मतदान केंद्राच्या व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यासोबतच निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यक मनुष्यबळ, मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण, आदर्श आचारसंहितेचे पालन या सर्व बाबीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.