मावळ : मागील निवडनुकीत अधिक मताधीक्यांनी बाळा भेगडे निवडुन आले होते. या निवडणुकीत त्यांना दुप्पट मतांनी मावळातील मतदारांनी निवडून आणल्यास त्यांना राज्यमंत्री पदावरून बढती देऊन कॅबिनेट मंत्री करतो असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
तळेगाव दाभाडे येथे आयोजित मावळ विधानसभा मतदारसंघाच्या प्रचार निवडणूक सभेत ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री आणि मावळ विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार संजय उर्फ बाळा भेगडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रसाद लाड, माजी आमदार दिगंबर भेगडे, रुपलेखा ढोरे, रवींद्र भेगडे, संतोष दाभाडे व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्यमंत्री यांचे उपस्थितीत कात्रज दूध संघाचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक बाळासाहेब नेवाळे आणि पंचायत समितीचे दत्ता शेवाळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपात प्रवेश करण्यात आला. यावेळी मोठया संख्येने जमलेल्या जनसमुदयात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विधानसभा निवडणुकीचा निकाल चार महिने आधीच लागला आहे. मतदारांनी क्रांती करून या निवडणुकीत काय होणार हे आधीच सांगितले. 15 वर्ष सत्तेत असताना आघाडीने केवळ भ्रष्टाचार केला आणि स्वतःची कमाई केली आहे. विरोधक यांनी 15 वर्षाचा हिशोब द्यावा मी पाच वर्षांचा हिशोब देतो.
राज्यात 50 लाख शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. राज्यात शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत, दुष्काळ मदत , कर्जमाफी दिली आहे. त्याचप्रमाणे पाच वर्षात 50 हजार कोटी शेतकऱ्यांना दिले आहेत. सिंचन कामे केली, पूर भागातील पाणी दुष्काळ भागात नेण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना माध्यमातून 30 हजार किलोमीटर रस्ते तयार केले. हजारो कोटी रुपये खर्च करून पालखी मार्ग काम वेगाने होत आहे. गरिबांसाठी 7 लाख घरे निर्माण केली, 2021पर्यंत कोण बेघर राहणार नाही असा संकल्प केला आहे. विविध गावठाण मधील जमिनी नियमित करणे निर्णय घेतला आणि तीन लाख घरे अधिकृत केली आहे. राज्यातील सर्व शहरे हागणदारीमुक्त केली, पिण्याचे पाणी, भुयारी गटारे कामे करण्यात येत आहे.
देशात सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली असून वेगवेगळ्या कंपन्या येत असल्याने प्रत्येकाला रोजगार मिळेल. एक कोटी लोकांना पुढील पाच वर्षात रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. एक कोटी परिवार बचत गटाशी जोडणार आणि त्यांचे उत्पादनाचे मार्केटिंग केले जाईल त्यातून महिलांना रोजगार मिळेल. शिक्षण, आरोग्य यामध्ये ही चांगल्या प्रकारे काम करण्यात येत आहे. 40 लाख लोकांचे ऑपरेशन आणि वैद्यकीय उपचार राज्यभरात मागील पाच वर्षात करण्यात आले आहे.
राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले, छत्रपती यांचा मी मावळा असून गद्दारी कोणाच्या रक्तात आहे हे मतदारांना विरोधी उमेदवारी वरून दिसून आले आहे. मिसाईल प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण प्रश्न आणि बैलगाडा शर्यत हे दोन प्रश्न बाकी असून मुख्यमंत्री यांनी त्यात पुढाकार घ्यावा. रोजगार आणि पर्यटन याकरिता पुढील काळात प्राधान्यने काम करण्यात येईल.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला कोणतेही धोरण राहिलेले नाही. केवळ पैशाचे जीवावर भाजपने टाकून दिलेल्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने मावळ तालुक्यात उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मावळ मधून हद्दपार करण्याचे काम मतदार या निवडणुकीत करतील असे मत पीडीसीसी बँकेचे संचालक आणि कात्रज दूध संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांनी व्यक्त केले.
मावळला कॅबिनेट पद द्या
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पार्सल लोकसभा निवडणुकीत बारामतीला पाठवले आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार न मिळाल्याने त्यांनी आमच्यातील एकाला उमेदवारी दिली. त्यामुळे खऱ्या अर्थाने हजारो मतांनी संजय भेगडे विजयी होतील असे मत खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले. आगामी निवडणूक मध्ये बाळा भेगडे यांना कॅबिनेट मंत्री पद देण्यात यावे अशी विनंती मुख्यमंत्री यांना त्यांनी केली.
निष्ठा सांगायची नाही, तर दाखवावी लागते
भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी काय कामे केली आहे ती जनतेला माहीत आहे. निष्ठा ही सांगायची नसती निष्ठा ती दाखवायची असती. आमचा विजय हा निश्चित आहेत त्यावर आमची कोणतीही शंका नाही असे मत प्रचारप्रमुख रवींद्र भेगडे यांनी व्यक्त केले.
पैसे,भूलथापा यांना बळी पडू नका
बारामतीचे पार्सल लोकसभा निवडणुकीत बारामतीला पाठविले, जो स्वतःच्या पोराला विजय मिळवून देऊ शकत नाही तो दत्तक पुत्राला काय विजयी करणार. महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची सुवर्णसंधी मावळ तालुक्याला आली आहे. सेवा करताना ती विधायक असली पाहिजे विचारांची असली पाहिजे. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका असे मत आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे यांनी व्यक्त केले.
पक्ष निष्ठावेळी शेळके यांनी पक्ष बदलला
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळकेंवरती अन्याय झाला त्यापेक्षा आपल्या नेत्यांवर काय झाले ते बघा, निष्ठा दाखविण्याची वेळ आली तेव्हा ह्यांनी एक रात्रीत पक्ष बदलला. भाजपने विकास केला नव्हता तर तुम्हाला भाजपची उमेदवारी कशाला हवी होती. आमचा विकास हा जनतेला माहिती आहे आणि ते तुम्हाला धडा शिकवतील. आजची गर्दी ही विजयाचा आकडा सांगण्यासाठी खूप आहे. आज जमलेली जनता ही पगारी नाही तर निष्ठावंत आहे. अशा जोरदार शब्दांत भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी विरोधकांवर ताशेरे उडवले.