पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकी अंतर्गत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर सुरु करण्यात आलेल्या मतदार मदत केंद्राचे (डिस्ट्रिक्ट कॉल सेंटर) उद्घाटन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, अजित रेळेकर, सुरेश जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, उपजिल्हाधिकारी वर्षा पवार, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग आदी उपस्थित होते.
मतदार मदत केंद्रामध्ये एकूण 15 दूरध्वनी संच जोडण्यात आलेले आहेत. मतदान करण्यामध्ये येणाऱ्या अडचणींबाबत तसेच मतदानाच्या अनुषंगाने असणाऱ्या मतदारांच्या प्रश्नांचे निराकरण जिल्हा मतदार मदत केंद्राद्वारे केले जाईल. विधानसभेसाठी दिनांक 21 ऑक्टोबर 2019 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार असून पुणे जिल्ह्यातील अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे, असे आवाहनही या कक्षातील दूरध्वनी वरुन मतदारांना करण्यात येणार आहे.
मदत केंद्रातून माहिती देणाऱ्या कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी राम यांनी मतदारांचे संभाव्य प्रश्न विचारले तसेच हे कर्मचारी समर्पक उत्तरे देत असल्याची खात्री केली. याबरोबरच दूरध्वनीवरुन माहिती देतांना अभ्यासपूर्ण माहिती देण्याबाबत यावेळी त्यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील सर्व मतदारांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानांचा हक्क बजावावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. कार्यक्रमास महसूल तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा मतदार मदत केंद्राचे (जिल्हा कॉल सेंटर) संपर्क क्रमांक खालील प्रमाणे आहेत.
020-26121231, 020-26121259, 020-26121263, 020-26121264,
020-26121267, 020-26121268, 020-26121269, 020-26121271,
020-26121272, 020-26121273, 020-26121274, 020-26121275,
020-26121279, 020-26121281, 020-26121291