नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशभक्ती जागृत करण्यासाठी भारत पर्व हा वार्षिक कार्यक्रम आजपासून येत्या ३१ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. देशातील मूलभूत तत्वे आणि त्याचे सार याची ओळख करून देण्यासाठी यंदा या पर्वाचे www डॉट भारत पर्व दोन शून्य दोन एक डॉट कॉम या आभासी मंचावर आयोजन करण्यात आले आहे.
लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून पर्यटन मंत्री प्रहलाद सिंग पटेल हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील पर्यटन स्थळे, पाककृती, हस्तकला आणि इतर वैशिष्ट्य असणार प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे.
नागरिकांना; देशभक्ती, देशातील समृद्धता आणि सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवण्यासाठी २०१६ पासून सुरुवात झालेल्या या कार्यक्रमाचे पर्यटन मंत्रालय दरवर्षी २६ ते ३१ जानेवारी दरम्यान लाल किल्ल्यासमोर आयोजन केले जात.
प्रजासत्ताक दिनाच्या कवायतीची झलक आणि सशस्त्र दलाच्या संगीत वाद्य वृंदाची ध्वनिमुद्रित कला यावर उपलब्ध असणार आहे. या अनोख्या भारत पर्वात विविध चित्रफिती, चित्रपट, प्रतिमा, माहिती पुस्तिका आणि विविध संस्थांची माहिती देखील प्रदर्शित केली जाणार आहे.