मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड पार्श्वभूमीवर राज्यात बंद असलेली महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून घ्यावा लागेल, असे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते काल कोल्हापूर येथे बोलत होते.

अनेक महाविद्यालयांची तसेच विद्यापीठाची वसतीगृहे कोविड केंद्र म्हणून वापरात घेतलेली आहेत, ती परत संस्थांच्या ताब्यात घ्यावी लागतील, त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनांनुसार सामाजिक अंतराचे नियम पाळून महाविद्यालये सुरू करता येतील, असे सामंत यांनी नमूद केले.

वसतीगृहात विद्यार्थी क्षमतेसोबतच, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शहरात आणायचे किंवा नाही, तसेच मुंबईतल्या विद्यार्थ्यांना उपनगरी रेल्वेचा पास द्यायचा किंवा नाही, याबाबतही विचार करावा लागेल, असे सामंत म्हणाले.

राज्यात सर्व विद्यापीठातून प्रबोधनकार ठाकरे अध्यासन केंद्रांची उभारणी करण्यात येणार असल्याची माहितीही, सामंत यांनी यावेळी दिली.