नवी दिल्ली : संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी अधिक संशोधन व विकास, नवीनतम शोध आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची कास आवश्यक असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. बंगळुरु इथे 7 व्या अभियंता परिषदेचे उद्‌घाटन करतांना ते बोलत होते. यंदाची परिषद ‘संरक्षण तंत्रज्ञान व नवीनतम शोध आणि डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे ग्रामीण भारताचे परिवर्तन’ या दोन संकल्पनांवर यंदाची परिषद आधारित आहे.

भूतकाळात भारतीय संरक्षण उद्योगाची पूर्ण क्षमता वापरली न गेल्यामुळे देश मोठ्या प्रमाणावर आयात केलेल्या शस्त्रसामग्रीवर अवलंबून राहिला, असे सिंह यांनी सांगितले. स्वदेशी बनावटीची, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची शस्त्रसामग्री विकसित केल्यामुळे देश स्वयंपूर्ण होईल आणि परकीय चलनाचीही मोठी बचत होईल, असे त्यांनी सांगितले.

संरक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेची गरज त्यांनी व्यक्त केली. संरक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता उपयोजनासाठी सरकारने आराखडा तयार केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. संरक्षण क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नवीनतम शोधांसाठी सरकारने उचललेल्या पावलांची सिंह यांनी माहिती दिली.

डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे ग्रामीण भारताचे परिवर्तन यावरही त्यांनी विचार मांडले. देशाच्या सर्वांगिण विकासासाठी ग्रामपरिवर्तन ही मूलभूत गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांच्या जीवनात परिवर्तन आणण्याचा सरकारचा निर्धार असून, त्याबाबत सरकारने उचललेल्या पावलांची सिंह यांनी माहिती दिली.