मुंबई : प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करून थकित रक्कमेसह अहवाल सादर करावा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिल्या. श्री. सामंत म्हणाले, यासंदर्भात वित्त विभागाशी पत्रव्यवहार सुरू असून सर्व तांत्रिक बाबी दूर करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.
प्राध्यापक, संस्था आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. केवळ सर्वांनी विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून कार्य करणे आवश्यक आहे, असेही श्री. सामंत यावेळी म्हणाले.
या बैठकीमध्ये महाराष्ट्रामध्ये विद्यापीठ नियामक मंडळाच्या निर्देशानुसार प्राध्यापक भरती प्रक्रिया करणे, वेतन नियामक मंडळाची स्थापना करणे, अर्धवेळ शिक्षकांसाठी सातवा वेतन आयोग लागू करणे, नामनियुक्त सदस्यांची नेमणूक, कंत्राटी/हंगामी शिक्षकांना ‘Equal Pay For Equal Work’ च्या तत्वानुसार वेतन मिळणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, संचालक डॉ. धनराज माने, महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ या संघटनेचे पदाधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.