नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयानं जेट एअरवेजचे माजी अध्यक्ष नरेश गोयल यांच्याविरोधात मनी लाँण्ड्ररिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. तसंच त्यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले आहेत.
नुकतचं मुंबई पोलिसांनी गोयल यांच्याविरोधात प्रथम माहिती अहवाल अर्थात एफआयआर दाखल केला होता. त्याची दखल घेत सक्तवसुली संचालनालयानं काल त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर आजही गोयल यांची चौकशी सुरु आहे.
मुंबईस्थित एका प्रवासी कंपनीला गंडा घातल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली होती. गेल्या वर्षी सप्टेंबरमधे केंद्रीय अन्वेषण संस्थांनी गोयल यांच्याविरोधात फेमा अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गोयल यांनी १९ खासगी कंपन्या स्थापन केल्या होत्या यापैकी पाच कंपन्यांची नोंदणी परदेशात केली होती, असं संचालनालयाचा आरोप आहे.