नैसर्गिक रंगांचे प्रदर्शन व विक्री स्टॉलला पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांची भेट

मुंबई : महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयात नैसर्गिक रंगांचे प्रदर्शन व विक्री स्टॉल उभारण्यात आला आहे. पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी या स्टॉलला भेट दिली. लोकांनी येणाऱ्या होळी उत्सवात रासायनिक रंग टाळून नैसर्गिक रंगांचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. नैसर्गिक रंगांमध्ये मेहेंदी, गुलमोहोर, पालक, हळद, मका, नीळ या नैसर्गिक घटकांचा वापर करण्यात आला आहे.

रासायनिक रंगांमुळे आरोग्यावर मोठ्या प्रमाणात घातक परिणाम होतात. रासायनिक रंगांमुळे डोळे, केस तसेच त्वचाविकार उद्भवतात. नागरिकांनी रासायनिक रंगांमुळे होणारे वाईट परिणाम लक्षात घेऊन होळीला नैसर्गिक रंगांचाच वापर करावा, असे आवाहन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे व पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले.

मंत्रालयात राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य नागरिक येत असतात. या नागरिकांना व कर्मचाऱ्यांना पर्यावरणपूरक नैसर्गिक रंग स्टॉलच्या माध्यमातून उपलब्ध होत आहेत.