नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी काल नवी दिल्लीत राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्ययमातून संवाद साधला.

पुरवठा साखळी, विलगीकरण कक्ष, क्षमता उभारणी, माहितीचं व्यवस्थापन आणि जोखमीची माहिती लोकांना देण्याचे उपाय वाढवण्याचं आवाहन गौबा यांनी केलं. दरम्यान, पंजाबमधून आणखी एक नवीन रूग्ण आढळला असल्याचं वृत्त आहे. एकात्मिक आजार देखरेख कार्यक्रमांतर्गत अकरा हजार नऊशे तेरा प्रकरणांचा पाठपुरावा सुरू आहे.

कोरोनानं ग्रासलेल्या अमेरिकन नागरिकाशी संपर्क ठेवलेल्या ४०४ आसामातल्या भारतीयांची ओळख पटली असून त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे. ८ हजार आठशे सत्तावीस विमान उड्डाणांनी भारतात आलेल्या ९ लाख ४१ हजार सातशे सतरा आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी केली असून, त्यापैकी ५४ प्रवाशांना अधिक तपासणीसाठी रूग्णालयात पाठवलं आहे.

विमानतळांवर प्रवाशांची तपासणी करण्याचं काम चांगल्या प्रकारे करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ केली आहे. देशभरातल्या विमानतळांवर २८६ डॉक्टर, १६० परिचारिका आणि २९५ इतर आरोग्य कर्मचारी तैनात केले आहेत.