नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला हक्कांसंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघानं राजकीय घोषणापत्र स्वीकारलं आहे. महिलांच्या अधिकारांसंदर्भात संयुक्त राष्ट्रांनी एक नवीन घोषणा केली आहे.

महिलांच्या सध्याच्या अधिकाराचं संरक्षण करणं अभिप्रेत आहे असं या घोषणेत म्हटलं असलं तरी स्त्री पुरुष समानतेच्या दिशेनं कोणत्याही नव्या प्रस्तावांचा यात समावेश केलेला नाही. महिलांच्या सामाजिक स्थिती बाबतच्या आयोगाच्या ६४ व्या बैठकीत हि घोषणा करण्यात आली.

स्त्रियांच्या बाबतीत वर्षानुवर्षे होणार भेदभाव, समाजात खोलवर रुजलेली पितृसत्ताक व्यवस्था आणि महिलांना कायम हीन मानण्याच्या परंपरेमुळे आपल्या अर्थव्यवस्थेत तसंच राजकीय जीवनात, महिलांना नेहमीच गौण लेखलं गेलं त्यामुळे स्त्री पुरुष असमानता वाढीला लागली असं संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस एंटोनियो गुटेरस यांनी या बैठकीदरम्यान बोलताना सांगितलं.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पाश्वभूमीवर या बैठकीचा कालावधी कमी करण्यात आला होता, तसंच सदस्य राष्ट्रांनी आपल्या प्रतिनिधींना या बैठकीसाठी न्यूयॉर्कला पाठवू नये, असं आवाहन गुटेरस यांनी केलं होतं .