मुंबई : शेतकरी केंद्रबिंदू मानून त्याला चिंतामुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या सुरु असलेल्या प्रयत्नांचे प्रतिबिंब आज मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात उमटले असून कृषी विभागासाठी 3 हजार 254 कोटी रुपयांची तरतूद, शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठ्यासाठी सौरपंपाची नवीन योजना, मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना त्याचबरोबर दोन लाखांवरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी तसेच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ यासारख्या योजनांसाठी तरतूद केल्याने बळीराजाला बळ मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे व्यक्त केली.

अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना कृषिमंत्री श्री.भुसे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी चिंतामुक्त करण्यासाठी आम्ही पावले उचलली आहेत. अर्थसंकल्पामध्ये महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेसाठी 22 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून सुमारे 13 लाख 79 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 9 हजार 35 कोटी रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. त्याचबरोबर पीककर्जाचे पुनर्गठित केलेले कर्ज त्याचे मुद्दल व व्याजासह 2 लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता योजना तसेच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी योजना अशा दोन नवीन योजना शासनाने सुरु केल्या आहेत. त्यामुळे बळीराजा कर्जमुक्त होणार असून त्यातून तो चिंतामुक्त होण्याची वाटचाल सुरु झाली आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करतानाच या योजनेसाठी या आर्थिक वर्षात 2 हजार 34 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केल्याने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्राकडील मदतीची वाट न पाहता राज्यशासनाने स्वत:च्या निधीतून मदत केली आहे.

राज्यात जलसंधारणाची कामे व विकेंद्रित जलसाठे निर्माण होण्याकरिता मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना जाहीर केल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. ठिबक सिंचनला प्रोत्साहन देतानाच 75 ते 80 टक्के अनुदान देणाऱ्या योजनेचा विस्तार राज्यभर केल्याने शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

शेतीसाठी दिवसा वीज मिळावी यासाठी सौरकृषी पंप योजना दरवर्षी एक लाख सौरकृषी पंप बसविण्यात येणार आहे. रेशीम उद्योगाला चालना, काजू फळपीकावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाला चालना याचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आल्याने अर्थमंत्र्यांचे आभार मानत असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. याबरोबरच शेततळे व शेततळ्यांच्या अस्तरीकरणाला निधी उपलब्ध होणार आहे. एकंदरीतच हा अर्थसंकल्प कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांना सक्षम करणारा ठरणार आहे, असेही कृषिमंत्र्यांनी यावेळी सांगितले.