नवी दिल्ली : नेदरलॅण्डस येथे गेल्या आठवड्यात झालेल्या जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत आजवरची सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या भारतीय चमूचा केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत तिरंदाजांनी तीन पदके जिंकत, टोक्यो येथे 2020 साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत आपले स्थान पक्के केले आहे.
या स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी एक रौप्य आणि दोन कांस्य पदकांची कमाई केली. जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताची ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. भारताच्या रिकर्व्ह चमूतल्या अतानू दास, तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव यांनी रौप्य पदक जिंकले.
ऑलिम्पिक स्पर्धेत जाण्याची तसेच पदक जिंकण्याची क्षमता असलेल्या सर्व खेळाडूंना सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही रिजीजू यांनी यावेळी दिली.