नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद विरोधाच्या लढाईत भारत आणि श्रीलंका यांनी एकत्रित येवून काम करण्याचं ठकवलं आहे. दहशतवाद हा या भागातला मोठा प्रश्न आहे, हे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल श्रीलंकेचे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे यांच्या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते. श्रीलंका तमिळ समुदायाच्या समानता न्याय आणि शांततेचा सन्मान करेल, अशी आशा ही त्यांनी व्यक्त केली.

श्रीलंकेचं स्थैर्य, सुरक्षा आणि भरभराट ही केवळ भारताच्याच नव्हे तर, संपूर्ण हिंदी महासागर प्रदेशाच्या हिताची आहे.असंही ते म्हणाले. या चर्चेत दोन्ही प्रधानमंत्र्यांनी द्विपक्षीय संबंधांवर विस्तृत विचार विनिमय केला. तसंच व्यापार आणि गुंतवणूक संबंधांना चालना देण्याचंही ठरवलं. श्रीलंकेच्या विकासात भारत हा विश्वासू भागीदार असून शांतता आणि विकासाच्या त्या देशाच्या प्रवासात भारत सहाय्य करणं सुरू ठेवणार आहे, असं आश्वासन मोदी यांनी दिलं.

गेल्या वर्षी श्रीलंकेला दिलेल्या नव्या कर्जामुळे या दोन शेजारी राष्ट्रांमधलं सहकार्य आणखी मजबूत होईल. मच्छीमारांच्या प्रश्नांवर मानवतावादी भूमिका घेण्यात येईल, असं मोदी म्हणाले. आपल्या निवेदनात महिंद्रा राजपक्षे यांनी मोदी यांच्या शेजाऱ्याचं हित प्रथम पाहण्याच्या धोरणाबद्दल त्यांचे आभार मानले. राजपक्षे यांचं काल ५ दिवसांच्या भारतभेटीवर आगमन झालं.