पिंपरी : महापालिकेतर्फे शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी पीएमपीएमएलचा मोफत पास दिला जातो. केवळ शैक्षणिक वापरासाठी हा पास उपयोगात आणला जातो. शाळांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सन 2019-20 या वर्षाचे 3 कोटी 20 लाख रूपये देण्यास पीएमपीएलला देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

दरम्यान, शहरातील पास केंद्र आणि नागरी सुविधा केंद्रात अर्जाचे वाटप केले जात आहे. शाळेकडून सर्व विद्यार्थ्यांचे एकत्रित अर्ज भरून दिल्यास सर्व पासेस शाळेत वितरीत केले जाणार आहेत. खासगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या अर्जासोबतच्या कागदपत्रांची तपासणी झाल्यावर पासची 25 टक्के रक्कम चलनान्वये बँक ऑफ बडोदाच्या कोणत्याही शाखेत महापालिकेच्या खात्यावर भरावी. त्यानंतर अर्ज, चलन व कागदपत्रे जवळच्या पीएमपीएलच्या आगारात सादर करावी लागणार आहे.