मुंबई : न्यूयॉर्क इम्पायर स्टेट ऑफ डेव्हलपमेंट विभागाच्या भागीदारी संचालिका (डिरेक्टर ऑफ पार्टनरशिप) लॉरेन मार्कल यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. भारत व अमेरिकेदरम्यान व्यापार, गुंतवणूक वाढविण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. दरम्यान,नवीन तंत्रज्ञान क्षेत्रात न्यूयॉर्कने महाराष्ट्र गुंतवणूक करावी, त्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही श्री. देसाई यांनी यावेळी दिली.

श्री. देसाई म्हणाले, महाराष्ट्र राज्य औद्योगिकदृष्ट्या प्रगतशील राज्य आहे. जगभरातील गुंतवणूकदार महाराष्ट्राची निवड करतात. त्यामुळे थेट परकीय गुंतवणुकीचे प्रमाणात 35 टक्के इतके आहे. येत्या काळात न्यूयॉर्क राज्याने महाराष्ट्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत.त्यांना शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. सध्या राज्य शासन डिजिटलायझेशनवर अधिक भर देत आहे. नुकतेच शासनाने ब्लॉक चेन सँड बॉक्स तंत्रज्ञान विकसित केले आहे. या क्षेत्रात महाराष्ट्रासोबत काम करावे, त्यांना आम्ही सर्व सुविधा देऊ, अशी ग्वाही श्री. देसाई यांनी दिली.

दरम्यान,जगभरातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र ग्लोबल इन्व्हेस्टमेंट फोरमची स्थापना केली जाणार आहे. त्यासाठी अमेरिकेतील कंपन्यांनी सहकार्य करावे, असेही श्री. देसाई म्हणाले.

थेट परकीय गुंतवणूक वाढविण्यासोबत कृषी, जैव, विज्ञान, शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रात भारतासोबत काम करण्याची न्यूयॉर्कची तयारी आहे. भारतातील गुंतवणूकदारांनी देखील न्यूयॉर्क राज्यात गुंतवणुकीसाठी पुढे यावे, असे मार्केल यांनी सांगितले.