डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचा संसर्गाचा धोका कमी करण्याचा उद्देश – जिल्हाधिकारी यांनी केले लोकार्पण
वर्धा : जगात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग होत आहेत. हॅन्डवॉश स्टेशन, सॅनिटायझर व्हॅन अशा नाविन्यपूर्ण संकल्पना समोर येत असताना आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाचा धोका स्वॅब कलेक्शन बूथ तयार करून रोटरी क्लबने कमी केला आहे. असे बूथ जिल्ह्यातील कोविड रुग्णालय असणारे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथे लावण्यात आले आहे.
सर्वत्र कोरोनाचे थैमान सुरू असताना वर्धा जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यात प्रशासनासोबतच जिल्ह्यातील सामाजिक संस्था, कार्यकर्ते आणि नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरत आहे. कोरोनाचा सर्वात जास्त धोका रुग्णाच्या निकट संपर्कात येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आहे. यातील पहिली पायरी, एखादा संशयित कोरोना बाधित आहे की नाही याची चाचणी घेण्याची असते.
या पहिल्या पायरीवरच काळजी घेतली गेली तर पुढील धोका कमी होऊ शकतो. चाचणीसाठी संशयित रुग्णाच्या घशातील व नाकातील स्त्राव हात तोंडात घालून डॉक्टरांना काढावा लागतो. स्त्राव घेणारा कर्मचारी हा संशयित रुग्णाच्या सर्वात जास्त जवळ जातो. त्यामुळे या आरोग्य कर्मचाऱ्यांला सुरक्षितपणे स्त्राव घेता यावा यासाठी रोटरी आणि डी एस फर्निचर यांनी स्वॅब कलेक्शन बूथ तयार केला आहे.
यामुळे पीपीई पोशाख घालण्याची सुद्धा आवश्यकता लागत नाही. यामध्ये आरोग्य कर्मचारी हा बुथच्या आत राहतो. संशयित व्यक्ती त्या बूथ समोर येऊन उभी राहिल्यावर बूथला लागलेले हात मोजे घालून डॉक्टर केवळ हाताने रुग्णाच्या घशातील व नाकातील स्त्राव घेतो. संशयित व्यक्ती आणि डॉक्टर यांच्यामध्ये काच लागलेली असल्याने स्त्राव घेताना रुग्णाच्या तोंडाशी किंवा शरीराशी डॉक्टरांचा थेट संपर्क येत नाही आणि कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका या पहिल्या पायरीवरच थांबवता येतो.
हे स्त्राव कलेक्शन बूथ बनविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे यांनी रोटरीला सांगितल्यावर त्यांनी लगेच होकार दिला. सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता आणि रोटरीचे माजी प्रांत पाल महेश मोकलकर यांनी यासाठी अतिशय परिश्रम घेतले. या लॉकडाऊनच्या काळात साहित्य मिळवण्यासाठी त्रास झाला. पण ज्या दुकानदाराकडे गेलो त्यांनी कोणतेही पैसे न घेता यासाठी लागणारे साहित्य विनामूल्य उपलब्ध करून दिले. डी एस फर्निशर यांनी माझ्यासोबत रात्रंदिवस काम करून ४८ तासात दोन बूथ तयार करून दिले. आपल्या कोरोना योद्धांसाठी आपलेही काही देणे आहे या माणुसकीच्या जाणिवेने सर्वांनी यासाठी सहकार्य केले असे महेश मोकलकर यांनी सांगितलेसाठी रोटरी क्लब गांधी सिटी चे अध्यक्ष पंकज शर्मा , मनीष सराफ, आसिफ झाईद, मनोज जुमडे, पिंकी उमरे, मूर्तुझा हुसेन, काईत इसाजी यांचा महत्त्वाचा सहभाग होता.
या अभिनव बूथमुळे आरोग्य कर्मिना भरपूर सुरक्षितता मिळेल आणि त्यांच्या मनातील भीती कमी होईल. यासोबतच लोकांच्या मनातील स्वॅब कसे घेतात याचे गैरसमज दूर होतील. जगात अशा पद्धतीच्या बुथचा वापर काही देशांनी केला आहे. आपल्या देशातही पोंडीचेरी, कोईम्बतुरमध्ये असे बूथ लावण्यात आले आहेत. या बुथमुळे स्त्राव घेण्याची प्रक्रिया अतिशय सुलभ आणि सोपी झाली आहे. तसेच हे बूथ बाहेरच लावले असल्यामुळे एखादा संशयित रुग्णाचा रुग्णालयातील इतर रुग्णांशी संपर्क येण्याचीही शक्यता राहत नाही, असे मत कस्तुरबा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. एस. पी.कलंत्री यांनी व्यक्त केले.
आज सेवाग्राम वैद्यकीय महाविद्यालयात स्वॅब कलेक्शन बुथचे लोकार्पण जिल्हाधिकारी विवेक भिमानवार यांनी केले.