नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात खेळाडूंवर पदक आणलंच पाहिजे असं मानसिक दडपण कधीही दिलं जात नाही. ग्रामीण भागातल्या प्रतिभावंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न असतो असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. टोकियो इथं दिव्यांगांसाठीच्या ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणार असलेल्या भारतीय खेळाडूंशी त्यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. देशभरात मिळून अडीचशे जिल्ह्यांमधे ३६० खेलो इंडीया केंद्र सुरु करण्यात आली असून आणखी सुरु होतील असं त्यांनी सांगितलं. देशात क्रीडासंस्कृतीचा विकास करण्यासाठी सातत्याने तंत्रज्ञानात सुधारणा करणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये ९ क्रीडाप्रकारांमधून एकंदर ५४ दिव्यांग खेळाडूंचं पथक सहभागी होत आहे. आत्तापर्यंतच्या इतिहासात भारताकडून पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी चाललेलं हे सर्वात मोठं पथक आहे.

केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री अनुरागसिंग ठाकूर यांनी यावेळी खेळाडूंच्या कामगिरीचं आणि लढाऊ वृत्तीचं कौतुक केलं तसंच खेळाडूंना खंबीर पाठिंबा दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

तिरंदाज ज्योती बाल्यन, राकेश कुमार, भालाफेकपटू देवेंद्र झाझरिया, धावपटू मरियप्पन थंगावेलु, बॅडमिंटनपटू पारुल परमार आणि पलक कोहली, नेमबाज सिंगराज, पॉवर लिफ्टर सकीना खातुन, नाविक प्राची यादव या खेळाडूंनी संवादात भाग घेतला आणि आपापले अनुभव सांगितले.