नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्गामुळे निर्माण झालेली स्थिती आणि त्याचा सामना करण्यासाठी विविध मंत्रालयानी केलेल्या कार्यवाहीचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल एका बैठकीत आढावा घेतला. नवी दिल्लीत झालेल्या या बैठकीला, आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांच्यासह इतर मंत्री उपस्थित होते. या विभागाने आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांचे प्रधानमंत्री कौतुक केले.

संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज रहायला हवे असे सांगून ते म्हणाले की सर्व विभागांनी एकमेकांमध्ये समन्वय साधून जनतेत या रोगाबाबत जागृती आणि खबरदारीचे उपाय योजण्यासाठी काम करावे. संबंधित अधिकाऱ्यांनी या रोगाच्या निवारणासाठी जगभरात उपलब्ध असलेले सर्वोत्तम उपाय अवलंबावेत अशी सूचना त्यांनी केली.

लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, तसेच या विषाणू संसर्गापासून लांब राहण्यासाठी काय करावे आणि काय करू नये याबाबत जनतेला सातत्याने माहिती देत रहावे असही ते म्हणाले.

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यास त्या भागात कुठल्या ठिकाणी विलगीकरण केंद्रं स्थापन करता येतील याचा शोध घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेली औषधे, तसेच इतर साधनसामग्रीचा पुरेसा साठा आहे की नाही याचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला.

नागरिकांनी अफावांवर विश्वास ठेवू नये तसेच घाबरुन जाऊ नये असे आवाहन यापूर्वीचे प्रधानमंत्र्यांनी केले आहे. या बैठकीत आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी राज्यांबरोबर प्रभावी संमन्वय आणि त्वरित प्रतिसाद देण्याच्या गरजेवर भर दिला.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आसामचे मुख्यमंत्री सरबानंद सोनोवाल यांनी संबंधित विभागाचा आढावा घेतला. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. तसंच आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं, असं आवाहन त्यांनी केलं.

विदेशी पर्यटकांना बघून घाबरू नये, असंही ते म्हणाले. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये जंतू नाशकांची फवारणी करावी, असे निर्देशही त्यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. दरम्यान, केरळमध्ये नवे पाच रुग्ण आढळल्यामुळे देशांतल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३९ झाली आहे.