राज्यातील बाधित रुग्णांची संख्या १४ वर – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : राज्यात आज तीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. यातील एक रुग्ण पुणे येथील असून या ३३ वर्षीय पुरुषाने अमेरिकेला प्रवास केला आहे. कस्तुरबा रुग्णालयात भरती असलेला आणि फ्रान्सच्या प्रवासाचा इतिहास असलेला ठाणे येथील ३५ वर्षीय तरुण तसेच हिंदुजा येथे भरती असलेला आणि दुबई प्रवासाचा इतिहास असलेला ६४ वर्षाचा पुरुष रुग्ण आज प्रयोगशाळेत तपासणीत कोरोना बाधित आढळला. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १४ झाली आहे,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. सर्व कोरोना बाधित रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेणे युद्धपातळीवर सुरु आहे. आज राज्यात एकूण ५० नवीन संशयित भरती झाले आहेत.
१२ मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत १२९५ विमानांमधील १ लाख ४८ हजार ७०६ प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार सर्व देशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी राज्यातील या ३ विमानतळांवर करण्यात येत आहे. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. ब्युरो ऑफ इमिग्रेशन द्वारे इराण, इटली आणि दक्षिण कोरियामधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशात सध्या कोरोना उद्रेक मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याने २१ फेब्रुवारीनंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकूण ६८५ प्रवासी आले आहेत.
१८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ३९९ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी सर्व ३१७ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर १४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या ५१ जण पुणे येथे तर २७ जण मुंबईत भरती आहेत. याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर आणि वायसीएम रुग्णालय पिंपरी चिंचवड येथेही संशयित रुग्ण भरती आहेत.
नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले असून राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये ५०२ बेड्स उपलब्ध आहेत.
मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित असणाऱ्या १२ देशातून आलेल्या इतर प्रवाशांची यादी पाठपुराव्यासाठी राज्यातील आरोग्य विभागास दैनंदिन स्वरुपात देण्यात येते. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण ६८५ प्रवाशांपैकी ३८३ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.
राज्य नियंत्रण कक्ष ०२०/२६१२७३९४ टोल फ्री क्रमांक १०४