राजपत्रित अधिकारी महासंघ, दुर्गा मंचच्या वतीने महिला दिन साजरा

मुंबई : राज्यभरात विविध विभागात, जिल्ह्याच्या ठिकाणी प्रशासनात महिला अधिकारी काम करीत असून या महिला अधिकाऱ्यांना काही अडचणी असतील किंवा त्यांच्या काही समस्या असतील तर त्यांनी  थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले.

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ आणि दुर्गा मंचच्या वतीने मंत्रालयात महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर, राज्यमंत्री आदिती तटकरे, राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे, महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई, दुर्गा मंचच्या अध्यक्ष डॉ. सोनाली कदम, यांच्यासह महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

आजही महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या काही समस्या, प्रश्न असले तरी त्यांना बऱ्याचदा मोकळेपणाने बोलता येत नाही, मात्र महिला मंत्री असल्याने महिला अधिकारी कधीही माझ्याशी मोकळेपणाने बोलू शकतात. मनातल्या गोष्टी मोकळेपणाने सांगू शकता. महिलांनी सांगितलेले प्रश्न, समस्या सोडविण्याची ग्वाही यावेळी महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी यावेळी दिली. कोणत्याही महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांना माझ्याकडे येण्यास व्यक्तिश:  काही अडचण असेल तर मी माझ्या कार्यालयात एक ड्रॉप बॉक्स ठेवणार असून याद्वारेही महिला अधिकारी आपल्या समस्या- प्रश्न माझ्याकडे मांडू शकतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

स्वत:साठी वेळ द्या – आदिती तटकरे

घरातील महिला निरोगी असेल तर घर निरोगी राहते त्यामुळे महिलांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. महिला दिन हा एका दिवसापुरता न राहता आपण महिलांनी प्रत्येक दिवस आपलाच आहे हे मानले पाहिजे. आज प्रत्येकाची दैनंदिनी धावपळीची असते. काम करणाऱ्या महिलांना आपल्या नोकरीबरोबरच घरही सांभाळावे लागते. पण या सगळ्यात त्यांना स्वत:ला वेळ देता येत नाही, आपली आवड जोपासता येत नाही.त्यामुळे दिवसभरातील काही वेळ स्वत:साठी देणे आवश्यक आहेच शिवाय आपली आवड, छंद यासाठीही वेळ काढण्याची गरज राज्यमंत्री कुमारी तटकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सोनाली कदम यांनी केले. तर श्रीमती फरोग मुकादम, सोनलस्मित पाटील, ज्योती गायसमुद्रे, सुशिला पवार, विशाखा आढाव आदी महिला अधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांविषयी मनोगत उपस्थितांसमोर मांडले. वृषाली पाटील, रुपाली शेडगे, सविता नलावडे यांनीही आपल्या समस्या यावेळी मांडल्या. सिद्धी संकपाळ व मीनल जोगळेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सुवर्णा जोशी-खंडेलवाल यांनी आभार प्रदर्शन केले.