नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुंतवणूकदारांनी दुस-या पर्यायांकडे मोहरा वळवल्यानं मुंबई सराफा बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरात घसरगुंडी उडाली. सोन्याच्या दारात तोळ्यामागे एक हजार २७७ रुपयांची घट होऊन, तो ४२ हजार १९ रुपयांवर उतरला, तर चांदीच्या दरात किलोमागे दोन हजार ३८० रुपयांची घसरण होऊन तो ४२ हजार ७३० रुपये इतका कमी झाला.

आठवड्याभराच्या व्यवहाराचा विचार करता, सहा मार्चला सोन्याचा दर ४४ हजार २७४ रुपये प्रति तोळा, तर चांदीचा भाव ४६ हजार ७५० रुपये प्रति किलो इतका होता. दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर, प्रति तोळा एक हजार ९७ रुपये कमी होऊन ४२ हजार ६०० रुपये, तर चांदीचा भाव प्रति किला एक हजार ५७४ रुपये घसरुन ४४ हजार १३० रुपये झाला आहे.