नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३३ झाली आहे. काल रात्री पिंपरी-चिंचवडमध्ये ५ आणि आज सकाळी औरंगाबादमध्ये १ रुग्ण आढळून आला. संध्याकाळी पुण्यात आणखी एका रुग्णाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय एकूण ९५ संशयित रुग्णांना राज्यातल्या विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.
कोरोना बाधितांची संख्या वाढली असली तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. हा संसर्गजन्य रोग असला तरी रोग प्रतिकार क्षमतेच्या जोरावर तो रोखता येऊ शकतो. त्यासाठी शासनाने, डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
महाराष्ट्रात कोरोना चाचणी करण्यासाठी उपलब्ध सुविधांची क्षमता वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्यातल्या प्रमुख शहरांच्या व्यतिरीक्त औरंगाबाद, धुळे, मिरज आणि सोलापुरातल्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही लवकरच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची चाचणी सुरू होणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.