नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येस बँकेचे प्रवर्तक राणा कपूर आणि इतरांविरोधात मनी लॉड्रिंग चौकशी प्रकरणी रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना सक्त वसूली संचालनालयानं समंस बजावल आहे.

या आर्थिक संकटग्रस्त बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर ज्या मोठ्या कंपन्या कर्ज फेडू शकल्या नव्हत्या अश्या कंपन्यामध्ये अनिल अंबानी यांच्या समूहाच्या कंपन्याचा समावेश असल्यामुळे त्यांना आज मुंबईतल्या ईडी कार्यालयात हजर राहायला सांगितलं असल्याचं अधिकाऱ्यानी म्हटलं आहे.

अंबानी समूहाच्या कंपन्यांनी येस बँकेकडून सुमारे १२ हजार ८०० कोटी रुपये कर्ज घेतलं होतं जे नंतर अनुत्पादीत मालमत्तेत रुपातंरीत झालं. अंबानी यांनी वैयक्तिक कारणामुळे आज हजर राहू शकत नसल्याचं कळवलं आहे, त्यामुळे त्यांना नवीन तारीख दिली जाईल, असं अधिकाऱ्यानी सांगितलं आहे.

हजर राहिल्यानंतर काळा पैसा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अंबानी यांचा जबाब नोंदवला जाणार आहे.