नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येस बँकेचे कामकाज आज संध्याकाळपासून पूर्ववत होणार असल्याची ग्वाही बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार यांनी दिली आहे. या बँकेच्या रोख रकमे विषयी काळजी करण्याचं काही कारण नाही असंही ते म्हणाले.

बँकेच्य सर्व शाखांमध्ये आणि एटीएम मध्ये पुरेशी रोख रक्कम असून बँकेला रोख रकमेसाठी ईतर स्त्रोतांवर अवलंबून राहण्याची गरज नाही असंही त्यांनी सांगितलं. लोकांना आपल्या ठेवींसाठी काळजी करण्याची गरज नसून त्या सुरक्षित असल्याचंही ते म्हणाले.

बँकेचे ग्राहक आता बँकेच्या सर्व सेवा वापरू शकतात असंही त्यांनी सांगितलं. प्रशांत कुमार हे स्टेट बँकेचे माजी अधिकारी असून ते येत्या २६ मार्च पासून येस बँकेच्या मुख्य कार्यकारी पदाची सूत्रं स्विकारणार आहेत. मार्च महिन्यातच येस बँकेची साडे आठ ते दहा हजार कोटी रूपयांची वसूली पूर्ण होईल असंही ते म्हणाले.