नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-एकोणीस या झपाट्यानं पसरणा-या साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी देशवासियांनी सहकार्य करावं, असं आवाहन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज ते देशाला संबोधित करत होते.
येत्या रविवारी 22 मार्चला सकाळी सातपासून रात्री नऊवाजेपर्यंत सर्वांनीच आपणहून संचारबंदी पाळावी, असं आवाहन त्यांनी केलं. आरोग्यक्षेत्र, सरकारी कर्मचारी, पत्रकार आणि जीवनावश्यक सेवा देणारे लोक वगळता सर्वांनी या दिवशी घरीच रहावं, तसंच अशा रोगराईच्या काळात स्वच्छता आणि आरोग्यविषयक सेवा देणा-या कर्मचा-यांना अभिवादन करण्यासाठी संध्याकाळी पाच वाजता घराच्या दरवाज्यात, बाल्कनीत, खिडकीत उभं राहून टाळ्या वाजवून अभिवादन करावं, असं आवाहनही त्यांनी केलं. जनता कर्फ्यूचा संदेश प्रत्येकानं इतरांना द्यावा, कठिण परिस्थितीत देशाच्या सज्जतेची चाचणी त्यानं होणार आहे, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
आरोग्य विषयक सेवा सुविधा, यंत्रणांवर ताण येऊ नये या दृष्टीनं नेहमीच्या तपासण्या तसंच तातडीची गरज नसलेल्या शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्याची विनंती त्यांनी सर्वांना केली.
जीवनावश्यक वस्तूंचा, औषधांचा आणि मास्कचा पुरवठा व्हावा याची काळजी सरकार घेत असून, त्यांची साठेबाजी करु नये, असं आवाहन मोदी यांनी केलं.
कोविड-एकोणीसच्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेवरही गंभीर परिणाम होत असून, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखाली कोविड-एकोणीस आर्थिक प्रतिसाद कृतीदलाची स्थापना करण्याची घोषणा प्रधानमंत्र्यांनी केली. सर्व आर्थिक स्तरातल्या घटकांना याचा फटका बसत असून, दुर्बल घटकांना सुस्थितीत असणा-यांनी मदत करावी, असं आवाहन त्यांनी केलं.
कोरोना प्रादुर्भावाबाबत अफवा पसरवू नयेत, तसंच पसरु देऊ नयेत, असं प्रधानमंत्री म्हणाले.
युद्धापेक्षाही जास्त जीवितहानी या आजारामुळे जगभरात झाली आहे. यावरुन त्याचं गांभीर्य लक्षात येतं. म्हणूनच सर्वांनीच सावधगीरी बाळगण्याची गरज आहे. यापूर्वी कोविड-एकोणीसचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमधे दुस-या टप्प्यात या आजाराचा फैलाव अतिशय वेगानं झाल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे स्वतःला आणि इतरांना वाचवणं आपलं कर्तव्य आहे, असं ते म्हणाले.