मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नैतिक शिक्षणावर भर देण्यात आला आहे. बिर्ला समूहाच्या देशभरातील शिक्षण संस्थांनी फार पूर्वीपासून भारतीय संस्कारांना महत्व दिले आहे. देशातील खासगी शिक्षण क्षेत्रात बिर्ला समूह आघाडीवर आहे. आता आंतरराष्ट्रीय शाळेच्या माध्यमातून ज्ञानदान करीत असताना देखील संस्थेने नैतिक मूल्यांची जपणूक करावी अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली.
यश बिर्ला समूहातर्फे चालविण्यात येणाऱ्या बिर्ला ओपन माइंड्स आंतरराष्ट्रीय शाळेचे (आयजीसीएसई) उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत गोपी बिर्ला मेमोरियल स्कूल, वाळकेश्वर येथे अलीकडेच संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.
स्वामी विवेकानंद यांनी शिक्षण हे मनुष्य घडविणारे असावे अशी भावना व्यक्त केली होती. केम्ब्रिज मंडळाच्या सहकार्याने बिर्ला समूहातर्फे आता आयजीसीएसई बोर्डाचे शिक्षण देत असताना देखील संस्थेने भारतीय संस्कारांशी नाळ कायम ठेवावी, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी यश बिर्ला समूहाचे अध्यक्ष व उद्योगपती यश बिर्ला, व्यवस्थापकीय संचालक निर्वाण बिर्ला, माजी खासदार वाय पी त्रिवेदी, बिर्ला ओपन माइंड्स आंतरराष्ट्रीय शाळेच्या प्राचार्या सुकृती भट्टाचार्य, गोपी बिर्ला मेमोरियल स्कुलच्या प्राचार्या डॉ. वीणा श्रीवास्तव, उद्योजक सुखराज नाहर, फॅशन डिझाइनर शायना एनसी, असिफ भामला, शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.