नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सार्क व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये कश्मीरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल भारतानं पाकिस्तानवर टीका केली आहे. या व्यासपीठावरून मानवतावादी मुद्यांवरुन चर्चा अपेक्षित असताना पाकिस्ताननं त्याचा गैरवापर करत राजकीय चर्चा केली, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी नवी दिल्लीत बातमीदारांना दिली.

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी आपत्कालीन सार्क निधी उभारण्याचा प्रस्ताव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत मांडला होता, तो कार्यान्वित करण्यात आला असून काही सदस्य राष्ट्रांनी भारताकडे याबाबत विनंती केल्याचंही ते म्हणाले.

येत्या एक-दोन दिवसात, इटलीमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या पुढच्या तुकडीला मायदेशी परत आणण्याचे प्रयत्न होतील, असंही रवीशकुमार यांनी सांगितलं. इराणमध्ये परिस्थिती गंभीर असून तिथून 590 भारतीयांना मायदेशी आणण्यात आल्याचं अतिरिक्त सचिव दामू रवि यांनी सांगितलं.

कोरोनाची लागण, झालेल्या इराणमधल्या भारतीयांवर तिथेच उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीला आराम पडल्यावर त्यांना भारतात आणलं जाईल, अशी माहिती रवि यांनी दिली.