नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं समवर्ती सूचीमध्ये असलेल्या ३७ केंद्रीय कायद्यांची जम्मू काश्मीरमध्ये अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर गृह मंत्रालयाच्या जम्मू काश्मीर आणि लडाख विभागानं हे आदेश जारी केले आहेत.
जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन केंद्रीय अधिनियम स्वीकृती आदेश २०२० असं या आदेशाला समजलं जाईल आणि तो तातडीनं अस्तित्वात येईल. समवर्ती सूचीतले हे केंद्रीय कायदे आवश्यक सुधारणा आणि बदलांसह लागू झाल्यानं, जम्मू काश्मीरमध्ये प्रभावी प्रशासन आणि सुविहित बदल निश्चित होतील आणि भारतीय राज्यघटनेला अनुसरून त्यांची अंमलबजावणी करण्यामध्ये कोणतीही अस्पष्टता राहणार नाही.