नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं या महिन्याच्या २२ तारखेपासून सर्व आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी विमानांना देशात प्रवेश करायला एका आठवड्यासाठी बंदी केली आहे. एका अधिकृत निवेदनात ही माहिती दिली आहे.

६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सर्व नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी त्याबाबत सरकार योग्य ते निर्देश जारी करेल, असं निवेदनात म्हटलं आहे. यामधून  सार्वजनिक प्रतिनिधी, सरकारी कर्मचारी आणि वैद्यकीय व्यावसायिकांना वगळलं आहे.

त्याचप्रकारे १० वर्षांपेक्षा लहान बालकांना देखील घरीच ठेवावं आणि बाहेर पाठवू नये, अशी सूचना करण्यात आली आहे. रेल्वे आणि नागरी हवाई वाहतूकीमध्ये विद्यार्थी, रुग्ण आणि दिव्यांग वगळून इतर सर्व प्रवास सवलती स्थगित केल्या जातील.

आकस्मिक आणि अत्यावश्यक सेवा वगळून खाजगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यासाठी प्रवृत्त करावं, अशी विनंती राज्यांना करण्यात आली आहे.