मुंबई : खेळाडूंना कामगिरी बजावताना नोकरीत सवलत मिळावी यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ५ टक्के आरक्षण लागू आहे. मात्र, खाजगी क्षेत्रातही खेळाडूंना आरक्षण मिळण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती शालेय शिक्षण व क्रिडामंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.
विधानसभेत सदस्य संजय केळकर यांनी खेळाडूंच्या नोकरीतील आरक्षणाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना श्री. शेलार बोलत होते.
श्री. शेलार म्हणाले, एमपीएससी अंतर्गत पाच टक्के खेळाडू आरक्षणातील राखीव जागांवर बनावट खेळाडूंची निवड झाली की नाही याची तक्रारीअंती चौकशी करण्यात आली होती. सदर प्रकरणाची संबंधित उपसंचालक यांच्याकडून स्पर्धांच्या अभिलेखांची शहानिशा केली असता असा प्रकार घडला नसल्याचे आढळून आले आहे. तरी, बोगस प्रमाणपत्र प्राप्त करून घेतल्याबाबतचे सबळ पुरावे आढळून आल्यास प्रकरणाची शहानिशा करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती श्री. शेलार यांनी यावेळी दिली.