नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यभर पूर्णपणे संचार बंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय आंतर जिल्हा वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता इतर कुठल्याही कारणासाठी नागरिकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही.
टॅक्सी, रिक्षा, बस आणि खासगी वाहनांच्या वाहतुकीवर ही राज्यभरात निर्बंध लादण्यात आले आहेत. केवळ अत्यावश्यक गोष्टींसाठीच टॅक्सी, रिक्षा आणि खासगी वाहने वापरता येतील. ही वाहने अत्यावश्यक कामासाठी वापरतानाही रिक्षामध्ये चालकाशिवाय एकच प्रवासी तर टॅक्सी आणि खासगी वाहनांमध्ये चालकाशिवाय दोनच प्रवाशांना प्रवासकरता येईल, असे निर्देशही राज्य सरकारने दिले आहेत.
राज्यातली सर्व धर्मियांची धार्मिक स्थळे बंद करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या ठिकाणी दैनंदिन पुजेसाठी केवळ धर्मगुरूंनाच प्रवेश दिला जाईल इतरांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात संचार बंदीलागू करण्यात आली असली तरी जीवनावश्यक वस्तू, औषधे, अन्न धान्य आणि त्यांची वाहतूक करणारी वाहन सुरूच राहणार असल्याचं राज्य सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.
पशूखाद्य, शेतीसाठी लागणारं सामान, पशूंची औषधं यांची दुकानंही सुरू राहणार असल्याचं सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.