मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ‘मीच आहे माझा रक्षक’ या तत्वाचा अंगिकार करावा आणि परिस्थितीला गांभीर्यानं घेत, नागरिकांनी घरीच राहावं असं आवाहन महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केलं. आपणही यापुढे पत्रकारांसमोर बोलण्याऐवजी फेसबुक लाईव्ह सारख्या माध्यमातूनच माहिती देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कालची जनता संचारबंदी संपल्यानंतर आज सकाळी मुंबईत असंख्य नागरिक, वाहनं घेऊन बाहेर पडल्याची दखल घेतली असून, यासंदर्भात मुंबईच्या पोलीस आयुक्तांसोबत बोलणं केलं असल्याचं त्यांनी सांगितलं.

राज्यातल्या सर्वच शहरी भागात कलम १४४ लागू आहे, त्यामुळे ५ पेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमू नये, निकडीच्या गरजेशिवाय घराबाहेर पडू नये, अन्यथा कारवाईशिवाय कोणताही पर्याय उरणार नाही, त्यामुळे नागरिकांनी सरकारच्या सुचनांचं पालन करत घराबाहेर पडू नये असं आवाहनही त्यांनी केलं.

लहान मुलं आणि वयोवृद्धांची विशेष काळजी घ्यावी, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार असे आजार आधीपासून असल्यानं ज्यांची रोगप्रतिकार क्षमता कमी झाली आहे, त्यांनी अजिबात बाहेर पडू नये असं आवाहन त्यांनी केलं. इतर राज्यांशी जोडलेल्या आणि कोरोनाच्या प्रादुर्भावाच्यादृष्टीनं धोकादायक वाटणाऱ्या राज्याच्या सीमा बंद करण्याबाबत आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, सध्या गोव्याला लागून असलेली सीमा बंद केली आहे अशी माहितीही टोपे यांनी दिली.